चिखलाच्या रस्त्यावर नगरपरिषदेचा मुरुमाचा मलम!   

इंदापूर, (वार्ताहर) : गणेशनगरमधील चिखलमय झालेल्या संपूर्ण रस्त्यावर मुरुम टाकण्याऐवजी रस्त्याच्या सुरुवातीच्या भागावर मुरुम चिकटवून यंत्रे घेऊन निघून जाण्याचा प्रकार नगरपरिषदेशी संबंधित कामगारांनी केला. त्यामुळे रस्त्याच्या चिखलाच्या जखमेवर इंदापूर नगरपरिषदेने मुरुमाचे मीठ चोळले व रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मुद्द्याला बगल दिल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
 
गणेशनगर येथील या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे नियोजन होते. त्याआधी भूमिगत गटाराची पाईपलाइन टाकण्यासाठी तो रस्ता खोदण्यात आला. पाईपलााइन टाकून झाल्यानंतर त्याच मुरमाड मातीने जमीन एकसारखी करुन घेतली. रस्त्याला उतार केल्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल, असे नगरपरिषदेच्या प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र उतार करण्यासाठी मुहूर्तच सापडला नाही. मागील आठवड्यात सलग झालेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला. ज्या ठिकाणी सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी चेंबर टाकण्यात आले होते. तेथे करण्यात आलेले मोठे खड्डे भरण्याची तसदी वेळीच घेतली गेली नाही. तेथे पार राडारोडा झाला. लोकांना ये जा करणे जिकीरीचे झाले. त्याचा गवगवा झाल्यानंतर गुरुवारी सकाळी एक ट्रॅक्टर मुरुम आणून तो खड्डा यंत्राद्वारे भरुन घेण्यात आला. उर्वरित रस्त्याकडे पहाण्याची तसदी न घेता कामगार पसार झाले. या प्रकारामुळे रस्त्याच्या चिखलाच्या जखमेवर इंदापूर नगरपरिषदेने मुरुमाचे मीठ चोळले आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मुद्द्याला बगल देत या रस्त्यावरुन ये जा करणार्‍या  स्थानिक नागरिकांना, वाहनांना नगरपरिषदेने चिखल तुडवण्याची शिक्षा दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 
 
दरम्यान, या संदर्भात पत्रकारांनी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा, आरोग्य विभागाच्या अधिकारी रश्मी बारस्कर या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्यांनी तूर्तास या रस्त्यावर मुरुम टाकण्यात येईल. पुढच्या काळात डांबरीकरण करण्यात येईल, असे गुळमुळीत उत्तर दिले.सध्या इंदापूर नगरपरिषदेला मुख्याधिकारी नाही. माळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांकडे अतिरिक्त पदभार दिलेला आहे. नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांना देखील त्यांचे संपूर्ण नाव माहिती नाही. ते वाढीव हद्दीतील परिस्थिती कधी पहाणार व उपाययोजना कधी करणार हा ही प्रश्न आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण लांबणीवर पडेल असेच चित्र दिसत आहे.
 

Related Articles